Tuesday, June 23, 2009

माझ्या महाराष्ट्राचा त्रिकालवेध

समस्त तारकां दळांत भारी हर्ष दाटला होता. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहिकडे असं म्हणत तारकांगणात मुले हर्षभरे नाचत होती. मुलांच्या उधाणाला पारावार नव्हता. अहो का म्हणून का विचारताय ? त्यांच्या च्यानेलचा वाढदिवस म्हटलं की होणारच नां मुलांना आनंद...! माझा च्यानेल मोठ्ठा झाला म्हणून सारे कुमार एकत्र आले. आणि कुठल्या बागेत नाही बरं का.. तर कुठल्याशा चांगल्या पॉश पंचतारांकित हॉटेलमध्ये... अर्थात, वाढदिवसाला स्टार मंडळी येणार म्हटलं की तशीच बडदास्तही ठेवली पाहिजे म्हणा... तर वाढदिवसाची पार्टी सुरू झाली. अहो पार्टी काय म्हणता ? हॉटेलमध्ये असलं म्हणजे काय फक्त पार्टीच असते का ? अहो, तिथे तर माझा महाराष्ट्र ट्वेंटी ट्वेंटी अशा गहन आणि गंभीर विषयावर चर्चा सुरू होती. राजकारणापासून सगळ्याच क्षेत्रातल्या असामी त्याला उपस्थित होत्या आणि त्यांचे विचार सारी मुलं अवाक होऊन टेबलावर समोर जे येईल ते स्वाहा करत ऐकत होती. अकरा वर्षांनी माझ्या महाराष्ट्राचे काय होणार या चिंतेने ग्रासलेले सगळेच जण आपापले थोर विचार मांडत होते. उभा आडवा महाराष्ट्र मांडायचा म्हणजे त्याची अणुसंरचना मुळापासून तपासली पाहिजे नां..! त्यातून काकोडकर प्रभृतींनी मर्मावरच बोट ठेवलं. न्यूनगंड सोडला तरच महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करू शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा... असं महाराष्ट्र गीतात जरी म्हटलं असलं तरी आता मात्र, ते अजिबात खरं नाही, हे आताच्या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झालेलंच आहे. नजरेसमोर राष्ट्र ठेवून वाटचाल सुरू केलेल्या राष्ट्रवादी लोकांच्या तव्यावरची भाकरी करपली, हे त्यांच्या लक्षात यायला बराच वेळ गेला. बिच्चाऱ्या घड्याळाचाच दोष... आबांनाही त्यामुळे राहावलं नसावं. त्यांनी आपला गड शाबूत आहे ते सांगण्याचा निकराचा प्रयत्न केला. मुंबई हल्ल्यात आपला बळी गेल्याचं शल्य कदाचित पचवू न शकलेल्या विलासरावांनी ही नामी संधी सोडली नाही. कायदा आणि सुव्यवस्था योग्य असेल तर सगळे आलबेल असते, असं सांगत या कायदा आणि सुव्यवस्थेनंच आपला आणि आबांचा राजकीय बळी गेला, असं ते म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली. शरपंजरी पडलेल्या सेनेच्या पंतांनीही महाराष्ट्राचे मनोहारी स्वप्न मांडण्याचा प्रयत्न केला. तारकादळांच्या मांदियाळीत कमळदळांनीही आपल्या पाकळ्या पसरण्याची संधी दवडली नाही. अकरा वर्षांनी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असेल आणि राजकीय पक्षांची संख्या रोडावेल, अशी भविष्यवाणी मुंड्यांनी केली. ते करताना त्यांनी आबांनाच लक्ष्य केलं. राष्ट्रवादी तेव्हा काँग्रेसमध्ये विलीन झालेला असेल आणि आबा तुम्ही काँग्रेसमध्ये असाल, असं गोपीनाथराव म्हणाले. तेव्हा आबांना मनातल्या मनात बकरा झाल्याचं नक्कीच वाटलं असणार... असो. या सगळ्या राजकीय भाषणांमध्ये कुमारांना अपेक्षित असलेला स्वप्नातला महाराष्ट्र कुठेच येत नव्हता. त्यातून दिसून आली ती फक्त राजकीय शेरेबाजी आणि सत्ता संघर्षातले अंतर्गत हेवेदावे... अकरा वर्षांनी महाराष्ट्र कसा असेल याची चर्चा सुरू असतानाच आजचा महाराष्ट्र कसा आहे, त्याचे नेतृत्व करणारे कसे आहेत, याचेच वास्तव पाहायला मिळाले. महाराष्ट्राचं नवनिर्माण करू पाहणाऱ्या राजकुमारांनीही या सगळ्या परिस्थितीला राजकारण्यांनाच जबाबदार धरले. पण, हे करत असताना एक बोट तिकडे असलं तरी उरलेली बोटं आपल्याकडे येतात, हे सोयिस्करपणे ते विसरले असावेत. राजकीय प्रभृतींची असली भाषण कुस्ती पाहून उपस्थितांपैकी अनेक जण धोबीपछाड झाले म्हणे.... हे सगळं पाहून त्रिकालवेधी कुमारांना राहावलं नाही. त्यांनी आपली अस्मिता जपत ठाम मतं मांडली. महाराष्ट्राचं सामर्थ्य सांगताना आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव आठवते. याचे कारण त्रिकालवेधींनी बहुत खुबीने विशद केले. स्वातंत्र्यपूर्व काळात खरेतर असे आयकॉन झाले, पण त्यांना कोणत्या ना कोणत्या जातीच्या चौकटीत बंदीस्त करून ठेवले गेले. त्या चौकटीबाहेर कधी हे आयकॉन येऊ दिलेच नाहीत. विचारसरणींच्या नावाखाली जातीच्याच अस्मिता बलाढ्य झाल्याने महाराष्ट्राची प्रगती खुंटली, हे वास्तव बरंच काही सांगून जातं. पण, लक्षात कोण घेतो ? या वास्तवाकडे कुमारांनी कितीही उघडा डोळे बघा नीट असं सांगितलं तरी ऐकतील ते राजकारणी कसले....!
- चंबू गबाळे ( 23 जून 2009)