Tuesday, December 8, 2009

अभिव्यक्ती स्वातंत्र्य – वागळे आणि सामना

मध्यंतरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आयबीएन लोकमतच्या कार्यालयावर हल्ला केला आणि माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. आयबीएन लोकमतचे मुख्य संपादक असलेल्या निखिल वागळे यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्याला आयबीएनच्या कर्मचाऱ्यांनीही तितकेच चोख प्रत्युत्तरही दिले. या सगळ्याला निमित्त ठरलं सचिन तेंडुलकरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या आपल्या मुखपत्रातून केलेली टीका, त्यावर वागळेंनी आपल्या चॅनेलवर उपस्थित केलेला आजचा सवाल... मुळातच दोन्ही बाजू ह्या इतक्या आक्रस्ताळेपणाने मांडल्या गेल्या होत्या की, याला खरंच पत्रकारिता म्हणायची का ? असा मूलभूत प्रश्न पत्रकारितेकडे तटस्थपणे पाहणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तिला पडला. वागळे महाशय तर हा हल्ला म्हणजे समस्त पत्रकारितेवरचा, लोकशाहीवरचा हल्ला आहे असा टुमणा लावून बसले... तर दुसरीकडे सामनाकारांची लेखणी नेहमीसारखी अश्लीलतेच्या पातळीवर घसरली. शिवसेनेच्या हल्लेखोरांचं निधड्या छातीचे वाघ अशा शब्दांत केलेलं समर्थन कितपत योग्य आहे ? सामनाकारांनी आपल्या बहादूर सैनिकांच्या हल्ल्याने वागळेंची अक्षरशः फाटली होती, असं वर्णन केलं, ते पत्रकारितेच्या कोणत्या निकषांत बसतं? अर्थात, वागळे महाशय हेही काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत, हेही सूर्यप्रकाशाइतकेच स्वच्छ आहे. वागळेंना खाजून खरुज काढण्याची फार जुनी खोड आहे. आणि ते त्याचे वेळोवेळी भांडवलही करत आले आहेत. यापूर्वी नऊ वेळा हल्ला झाल्याचे ते आयबीएनवरून घसा फोडून फोडून सांगत होते, तेव्हा त्यांना पत्रकारितेपेक्षा स्वतःवर झालेले हल्लेच जास्त महत्त्वाचे असावेत, असं स्पष्ट जाणवत होतं. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र तरी आहे, त्यामुळे सामनाने शिवसैनिकांची तळी उचलणे हे स्वाभाविकच आहे. एका पक्षाचे मुखपत्र म्हणून त्याला पत्रकारिेतेची सगळी परिमाणे लावणे गैर आहे. पण, जग जिंकायला निघालेलं आयबीएन लोकमत हे फक्त वागळेंचं मुखपत्र असल्याचंच वारंवार स्पष्ट झालेलं आहे.
चोवीस तास वृत्तवाहिनी असलेल्या आयबीएन लोकमतवर निम्म्याहून अधिक काळ वागळे आणि फक्त वागळे असतात. आयबीएन लोकमतचा प्राईम टाईम असो किंवा आजचा सवाल, ग्रेट भेट असो किंवा साधं बातमीपत्र... प्रत्येकवेळी वागळे महाशय एकतर अँकरच्या तरी भूमिकेत असतात, नाहीतर एक्स्पर्टच्या तरी भूमिकेत असतात. प्रत्यक्ष स्क्रीनवर नसले तर फोनवरुन तरी त्यांचं अखंड वटवटपुराण सुरुच असतं. त्यामुळेच कदाचित सामनाकारांनी त्यांना वटवट वागळे असं संबोधलं असावं... हे झालं वागळेंचं.. पण, सामनाने सुद्धा वागळेंना टार्गेट करताना सभ्यतेची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारात सामनाचेही समर्थन करता येत नाही. ( वाचकांना हे वाचताना कदाचित सकाळचा अग्रलेख वाचत असल्याचा भास होत असेल, पण एका पारड्यात सामना आणि दुसऱ्या पारड्यात वागळे असं तोलायचं झालं तर दोन्ही बाजू आक्रस्ताळेपणाच्या बाबतीत समानच दिसतील. त्यामुळे आम्हाला सकाळकारांसारखं लिहावं लागतंय.)
या सगळ्या घटनाक्रमानंतर सुरु झाली चर्चा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची... अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेनं दिलं, तेव्हा कदाचित घटनाकारांना भविष्यात असे काही प्रकार होतील अशी यत्किंचितही कल्पना नसावी, अन्यथा त्यांनी असं काही कलम घटनेत समाविष्टच केलं नसतं. खरंतर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं घटनादत्त स्वातंत्र्य आहे आणि ते असलंही पाहिजे. पण, आपल्या व्यक्त केलेल्या मतामुळे दुसऱ्या व्यक्तीचं चारित्र्यहनन तर होत नाही नां याची काळजी घेतली गेलीच पाहिजे. त्यामुळेच तर वागळे कितीही कळकळीने बोलत असले तरी त्यांच्या वक्तव्यातून प्रतीत होणारी भाषा ही अवमान करणारी ठरते. वागळेंनी आपल्या सगळ्या आजचा सवाल या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंग्ज पुन्हा ऐकाव्यात आणि आत्मपरीक्षण करावे.
शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर ज्या पद्धतीने आयबीएन लोकमतने ही घटना कॅश केली त्यावरुन तर त्यांच्या मूळ हेतूविषयीच शंका उपस्थित होते. हल्ला झाल्यानंतर पत्रकारितेवर हल्ला, लोकशाहीवर हल्ला अशी ओरड वागळेंच्या चॅनेलवरुन सुरु झाली. त्यानंतरच्या दोन तीन दिवसांत राज्यात, देशात आणि जगात दुसरी कोणतीच महत्त्वाची घटना घडलीच नाही की काय, असं सामान्य प्रेक्षकाला वाटावं, त्याप्रमाणे आयबीएन लोकमतवर फक्त वागळेंवरच्या हल्ल्याचीच बातमी सातत्याने दाखवली जात होती. त्याच बातमीचा फॉलो अप, तेच ठरलेल्या रिपोर्टर्सचे फोनो इन, त्यावर वागळे महाशयांचं भाष्य, हल्ल्याचे एनकॅश केलेले फूटेज वापरुन सुरू झालेले प्रोमो... हे सगळं बापड्या प्रेक्षकांनी का म्हणून सोसावं? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोंडस कोंदणात हा सगळा प्रकार वागळेंनी बसवला नसता तर बरं झालं असतं. जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो, तेव्हा उरलेली बोटं आपल्याकडे असतात, हे त्यांनी विसरता कामा नये. त्यामुळेच वागळेंनी या सगळ्या घटनाक्रमाचा साकल्यानं विचार करुन आत्मपरीक्षण करावं. आपल्या एकट्यामुळे संपूर्ण आयबीएन लोकमत आणि त्या चॅनेलच्या प्रेक्षकांना वेठीला धरणं कितपत योग्य आहे....?
या हल्ल्याचा सगळ्या पत्रकारांनी एकत्र येऊन निषेधही नोंदवला. पण, त्याचवेळी खासगीत हेच पत्रकार बरे झाले, वागळेला चोपला असंच मत व्यक्त करत होते. अगदी आयबीएन लोकमतमधले कर्मचारीही मनातून खुशच झाले होते. आजचा सवालमध्ये स्क्रीनवर दाखवलं जाणारं प्रश्नाबाबतचं रेटिंगही आधीच निश्चित केलेलं असतं, असं आयबीएनमधल्याच एका सूत्राने सांगितलं. वागळेंवरचा हल्ला आणि त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला अशी दिलेली फोडणी या सगळ्या प्रकारावर मतमतांतरं मांडणारा एक ई मेल सध्या पत्रकार कम्युनिटीमध्ये फॉरवर्ड होतोय. त्यात विविध पत्रकारांनी मांडलेली मतं मुळातून वाचून विचार करायला लावणारी आहेत. पत्रकारितेची मार्गदर्शक तत्त्वं जी सांगितली गेली आहेत, ती अशा चॅनेलच्या दिखाऊपणामुळे धुळीला मिळत चालली आहेत. त्याला वेसण घालण्याचे प्रयत्न वेळीच झाले नाहीत तर डी गँगसारखी मीडिया गँग प्रेक्षकांच्या मानगुटावर बसेल, हे नक्की... अर्थात, अंतिम अधिकार प्रेक्षकांचाच आहे, कारण ज्याच्या हाती रिमोट, तोच ठरवी टीआरपी...!
- चंबू गबाळे ( 9 डिसेंबर 2009)