Tuesday, December 8, 2009

अभिव्यक्ती स्वातंत्र्य – वागळे आणि सामना

मध्यंतरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आयबीएन लोकमतच्या कार्यालयावर हल्ला केला आणि माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. आयबीएन लोकमतचे मुख्य संपादक असलेल्या निखिल वागळे यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्याला आयबीएनच्या कर्मचाऱ्यांनीही तितकेच चोख प्रत्युत्तरही दिले. या सगळ्याला निमित्त ठरलं सचिन तेंडुलकरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या आपल्या मुखपत्रातून केलेली टीका, त्यावर वागळेंनी आपल्या चॅनेलवर उपस्थित केलेला आजचा सवाल... मुळातच दोन्ही बाजू ह्या इतक्या आक्रस्ताळेपणाने मांडल्या गेल्या होत्या की, याला खरंच पत्रकारिता म्हणायची का ? असा मूलभूत प्रश्न पत्रकारितेकडे तटस्थपणे पाहणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तिला पडला. वागळे महाशय तर हा हल्ला म्हणजे समस्त पत्रकारितेवरचा, लोकशाहीवरचा हल्ला आहे असा टुमणा लावून बसले... तर दुसरीकडे सामनाकारांची लेखणी नेहमीसारखी अश्लीलतेच्या पातळीवर घसरली. शिवसेनेच्या हल्लेखोरांचं निधड्या छातीचे वाघ अशा शब्दांत केलेलं समर्थन कितपत योग्य आहे ? सामनाकारांनी आपल्या बहादूर सैनिकांच्या हल्ल्याने वागळेंची अक्षरशः फाटली होती, असं वर्णन केलं, ते पत्रकारितेच्या कोणत्या निकषांत बसतं? अर्थात, वागळे महाशय हेही काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत, हेही सूर्यप्रकाशाइतकेच स्वच्छ आहे. वागळेंना खाजून खरुज काढण्याची फार जुनी खोड आहे. आणि ते त्याचे वेळोवेळी भांडवलही करत आले आहेत. यापूर्वी नऊ वेळा हल्ला झाल्याचे ते आयबीएनवरून घसा फोडून फोडून सांगत होते, तेव्हा त्यांना पत्रकारितेपेक्षा स्वतःवर झालेले हल्लेच जास्त महत्त्वाचे असावेत, असं स्पष्ट जाणवत होतं. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र तरी आहे, त्यामुळे सामनाने शिवसैनिकांची तळी उचलणे हे स्वाभाविकच आहे. एका पक्षाचे मुखपत्र म्हणून त्याला पत्रकारिेतेची सगळी परिमाणे लावणे गैर आहे. पण, जग जिंकायला निघालेलं आयबीएन लोकमत हे फक्त वागळेंचं मुखपत्र असल्याचंच वारंवार स्पष्ट झालेलं आहे.
चोवीस तास वृत्तवाहिनी असलेल्या आयबीएन लोकमतवर निम्म्याहून अधिक काळ वागळे आणि फक्त वागळे असतात. आयबीएन लोकमतचा प्राईम टाईम असो किंवा आजचा सवाल, ग्रेट भेट असो किंवा साधं बातमीपत्र... प्रत्येकवेळी वागळे महाशय एकतर अँकरच्या तरी भूमिकेत असतात, नाहीतर एक्स्पर्टच्या तरी भूमिकेत असतात. प्रत्यक्ष स्क्रीनवर नसले तर फोनवरुन तरी त्यांचं अखंड वटवटपुराण सुरुच असतं. त्यामुळेच कदाचित सामनाकारांनी त्यांना वटवट वागळे असं संबोधलं असावं... हे झालं वागळेंचं.. पण, सामनाने सुद्धा वागळेंना टार्गेट करताना सभ्यतेची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारात सामनाचेही समर्थन करता येत नाही. ( वाचकांना हे वाचताना कदाचित सकाळचा अग्रलेख वाचत असल्याचा भास होत असेल, पण एका पारड्यात सामना आणि दुसऱ्या पारड्यात वागळे असं तोलायचं झालं तर दोन्ही बाजू आक्रस्ताळेपणाच्या बाबतीत समानच दिसतील. त्यामुळे आम्हाला सकाळकारांसारखं लिहावं लागतंय.)
या सगळ्या घटनाक्रमानंतर सुरु झाली चर्चा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची... अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेनं दिलं, तेव्हा कदाचित घटनाकारांना भविष्यात असे काही प्रकार होतील अशी यत्किंचितही कल्पना नसावी, अन्यथा त्यांनी असं काही कलम घटनेत समाविष्टच केलं नसतं. खरंतर प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं घटनादत्त स्वातंत्र्य आहे आणि ते असलंही पाहिजे. पण, आपल्या व्यक्त केलेल्या मतामुळे दुसऱ्या व्यक्तीचं चारित्र्यहनन तर होत नाही नां याची काळजी घेतली गेलीच पाहिजे. त्यामुळेच तर वागळे कितीही कळकळीने बोलत असले तरी त्यांच्या वक्तव्यातून प्रतीत होणारी भाषा ही अवमान करणारी ठरते. वागळेंनी आपल्या सगळ्या आजचा सवाल या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंग्ज पुन्हा ऐकाव्यात आणि आत्मपरीक्षण करावे.
शिवसैनिकांनी हल्ला केल्यानंतर ज्या पद्धतीने आयबीएन लोकमतने ही घटना कॅश केली त्यावरुन तर त्यांच्या मूळ हेतूविषयीच शंका उपस्थित होते. हल्ला झाल्यानंतर पत्रकारितेवर हल्ला, लोकशाहीवर हल्ला अशी ओरड वागळेंच्या चॅनेलवरुन सुरु झाली. त्यानंतरच्या दोन तीन दिवसांत राज्यात, देशात आणि जगात दुसरी कोणतीच महत्त्वाची घटना घडलीच नाही की काय, असं सामान्य प्रेक्षकाला वाटावं, त्याप्रमाणे आयबीएन लोकमतवर फक्त वागळेंवरच्या हल्ल्याचीच बातमी सातत्याने दाखवली जात होती. त्याच बातमीचा फॉलो अप, तेच ठरलेल्या रिपोर्टर्सचे फोनो इन, त्यावर वागळे महाशयांचं भाष्य, हल्ल्याचे एनकॅश केलेले फूटेज वापरुन सुरू झालेले प्रोमो... हे सगळं बापड्या प्रेक्षकांनी का म्हणून सोसावं? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोंडस कोंदणात हा सगळा प्रकार वागळेंनी बसवला नसता तर बरं झालं असतं. जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो, तेव्हा उरलेली बोटं आपल्याकडे असतात, हे त्यांनी विसरता कामा नये. त्यामुळेच वागळेंनी या सगळ्या घटनाक्रमाचा साकल्यानं विचार करुन आत्मपरीक्षण करावं. आपल्या एकट्यामुळे संपूर्ण आयबीएन लोकमत आणि त्या चॅनेलच्या प्रेक्षकांना वेठीला धरणं कितपत योग्य आहे....?
या हल्ल्याचा सगळ्या पत्रकारांनी एकत्र येऊन निषेधही नोंदवला. पण, त्याचवेळी खासगीत हेच पत्रकार बरे झाले, वागळेला चोपला असंच मत व्यक्त करत होते. अगदी आयबीएन लोकमतमधले कर्मचारीही मनातून खुशच झाले होते. आजचा सवालमध्ये स्क्रीनवर दाखवलं जाणारं प्रश्नाबाबतचं रेटिंगही आधीच निश्चित केलेलं असतं, असं आयबीएनमधल्याच एका सूत्राने सांगितलं. वागळेंवरचा हल्ला आणि त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला अशी दिलेली फोडणी या सगळ्या प्रकारावर मतमतांतरं मांडणारा एक ई मेल सध्या पत्रकार कम्युनिटीमध्ये फॉरवर्ड होतोय. त्यात विविध पत्रकारांनी मांडलेली मतं मुळातून वाचून विचार करायला लावणारी आहेत. पत्रकारितेची मार्गदर्शक तत्त्वं जी सांगितली गेली आहेत, ती अशा चॅनेलच्या दिखाऊपणामुळे धुळीला मिळत चालली आहेत. त्याला वेसण घालण्याचे प्रयत्न वेळीच झाले नाहीत तर डी गँगसारखी मीडिया गँग प्रेक्षकांच्या मानगुटावर बसेल, हे नक्की... अर्थात, अंतिम अधिकार प्रेक्षकांचाच आहे, कारण ज्याच्या हाती रिमोट, तोच ठरवी टीआरपी...!
- चंबू गबाळे ( 9 डिसेंबर 2009)

Sunday, July 26, 2009

चॅनेल सर्फिंग....

सध्या वाहिन्यांचा सुकाळू आहे. टीव्ही लावला आणि रिमोटने एकेक बटन दाबले की, आपल्याला या वाहिन्यांचा विविधांगी आविष्कार याचि देही याचि डोळा पाहायला मिळतो. म्हणजे आपल्या टीव्हीसंचात जास्तीत जास्त किती वाहिन्या दिसू शकतात, तितक्या वाहिन्या आपण आरामात पाहू शकतो. हल्ली तर डीटीएच सेवेमुळे आपल्याला हव्या त्या वाहिन्या आपल्या पसंतीक्रमानुसार घेता येतात. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, याचमुळे घरोघरचा सामान्य प्रेक्षक (बरेच मराठी निवेदक त्याला 'दर्शक' संबोधतात, मराठी भाषेचं दुर्दैव दुसरं काय.... ) टीव्ही माध्यमातला तज्ज्ञ झालाय. त्याला बरोबर कळतं की, कुठल्या वाहिनीवर किती वाजता काय आहे, कोणतं न्यूजचॅनेल कोणती बातमी कशी दाखवणार आहे, एखाद्या बातमीचा कीस काढण्यासाठी तथाकथित चर्चात्मक कार्यक्रमात कोणत्या तज्ज्ञाला बोलावणार आहे, तो तज्ज्ञ काय बोलणार आहे, याचे सगळे अंदाज सर्वसामान्य प्रेक्षक घरबसल्या मांडू शकतो. कदाचित माझं हे मत वाचून कोणतं तरी चॅनेल नक्कीच अशी एखादी स्पर्धाच आयोजित करू शकेल. म्हणजे कसं, आमच्या वृत्तवाहिनीवर दिवसभर चाललेल्या त्याच त्या बातम्यांचे प्रक्षेपण पाहा आणि संध्याकाळच्या चर्चात्मक कार्यक्रमाचा विषय काय असेल ते सांगा.... या सारख्या स्वरुपाच्या स्पर्धा भविष्यात टीव्हीवर पाहायला मिळाल्या तर नवल वाटायला नको. आणि याला परत व्ह्यूव्हर्स पार्टीसिपेशनचा चांगला मुलामाही देता येतो.
अहो, आता तुम्ही जर 'आयबीएन लोकमत' पाहत असाल, तर त्यावरच्या 'आजचा सवाल' मध्ये माध्यमादित्य वागळे जे काही बोलणार असतील, त्याचा कयास आधीच बांधता येतो. म्हणजे - 'आता मी जाणार आहे, नाशिकला तिथे माझे पाहुणे आहेत सो अँड सो....', 'माझा रिपोर्टर आता माझ्याबरोबर आहे, त्याला मी विचारणार आहे, ही बातमी कव्हर करताना तू दिवसभर त्याच्यापाठीमागे होता, काय जाणवलं तुला.....' वगैरे, वगैरे..... ही ठराविक साचेबद्ध वाक्यं आणि त्याला असलेला 'मी'चा स्पर्श.... हे वागळे यांच्या चर्चात्मक कार्यक्रमाचं वैशिष्टंय... कार्यक्रमाचे आपण अँकर आहोत, आपण कुणी तत्ववेत्ते नाही आहोत, आपल्याला कार्यक्रमात सहभागी लोकांना बोलतं करायचंय, त्यांच्याकडून मुद्दे वदवून घ्यायचेयत, याचं भानच साहेबांना राहात नसावं... शिरा फुटेपर्यंत वागळेंचं ओरडणं 'आयबीएन'वर दिवसभर सुरूच असतं... असो, त्यांना जग जिंकायचंय... त्यांना शुभेच्छा....
आता तुम्ही 'स्टार माझा' स्विच ऑन केला.... काय दिसेल ? काही अंदाज.... कुठला तरी 'माझा' म्हणजे 'दिवस माझा', 'अभ्यास माझा', इत्यादी इत्यादी.... मध्यंतरी समलिंगी संबंधांसंदर्भातल्या बातम्या सुरु होत्या, तेव्हा मला धडकीच भरली... न जाणो हे 'माझा' वाले.... माझा माझा म्हणत या बातम्यांच्या सेगमेन्टचं नावच 'गे माझा' ठेवतील...! पण, तसं झालं नाही... नशिब माझा.... सॉरी सॉरी.... नशिबं माझं.... तरी बरं स्टार माझानं हल्ली प्रेक्षकांना 'उघडा डोळे, बघा नीट...' असं सांगणं सोडून दिलंय... म्हणजे, सध्या तरी ते फारसं दिसतं नाही.... जी बातमी मिळेल, ती मोठी करून कशी दाखवायची... यातच बहुतेक त्यांचा वेळ जात असावा... कालपरवा शिवसेना आणि भाजपच्या स्वतंत्र पत्रकार परिषदा झाल्या. त्याची यांनी बातमी कशी दाखवली माहितीय ? युतीच्या एकाच वेळी दोन स्वतंत्र पत्रकार परिषदा... अहो, बातमी ट्विस्ट जरुर करावी, पण, ती अशी ? त्या दोन पक्षांत युती असली तरी ते दोन्ही पक्ष म्हणून स्वतंत्रच आहेत. त्यांचे पक्षाचे म्हणून असलेले कार्यक्रम सांगण्यासाठी, त्यांच्या पक्षात कोण प्रवेश करतंय, हे सांगण्यासाठी स्वतंत्रच पत्रकार परिषदा होणार नां... मुळातच कुमारवयीन चॅनेल असल्याने त्यांच्याकडून मॅच्युअरिटीची अपेक्षा तरी कशी करणार म्हणा... !
माझा दर्शन झाल्यावर तुम्ही समजा झी चोवीस तास पाहायला लागलात.... काय दिसेल... निळ्या पांढऱ्या लाल कलरस्कीम मधला टाइम्स नाऊचा भ्रष्ट मराठी अवतार... ! बातम्या त्याच चोवीस तास... असं तिथे काम करणारेच लोक म्हणतात म्हणे... त्यात कमालीचं तथ्यंही आहे.... त्याच त्या बातम्या चोवीस तास सुरू असतात... त्या बातम्या वाहिनीतले वरिष्ठ तरी पाहतात की नाही कुणास ठावूक... कारण, शब्दांच्या, व्याकरणाच्या चुकांसह त्याचं रिपीट टेलिकास्ट सुरु असतं...
या सगळ्या वाहिन्यांसाठी विषयांची कमी पडू नये, याची काळजी इतर मनोरंजन वाहिन्यांनी घेतलीय. म्हणजे, साधारणपणे, दुपारच्या वेळी बातम्यांचा स्लॅक सिझन असतो.. तेव्हा मग, इतर वाहिन्यांवर सुरू असलेल्या मालिकांवर छानपैकी बोलत राहायचं. म्हणजे, बालिका वधूमधली दादिसा आता काय करणार.... किंवा, अग्निहोत्रमध्ये नील आणि सईचं लग्न होणार का, मणि आणि दिनेश यांच्यातलं वैर संपणार का.... कुठल्या तरी कॉमेडी एक्स्प्रेसमधला विनोदाचा तोच तडका... कुठल्या तरी रिऍलिटी डान्स शोमधला धमाकेदार परफॉर्मन्स... दुसऱ्याच्या आयुष्यात नको तितके घुसून करायला लावलेला सच का सामना... आयटेम गर्ल राखी सावंतचं स्वयंवर.... असं बरंच काही त्या त्या वाहिन्यांच्या सौजन्यानं दाखवायचं... म्हणजे कसं दुपारचा स्लॉटही भरतो आणि दुपारचा टार्गेट ऑडियन्स असलेल्या महिलांना त्यांना हवं ते दाखवत असल्याचा दावाही करता येतो.... नाही कां...! किती भ्रमात चालत असतात या सगळ्या वाहिन्या... एक जुना किस्सा आठवला... एक बैलगाडी चाललेली असते आणि तिच्या खालून एक कुत्रा चाललेला असतो... त्या कुत्र्याला वाटत असतं की, आपल्यामुळेच ही बैलगाडी चाललेली आहे... पण, वस्तुस्थिती वेगळीच असते.... या रिऍलिटीकडे खरंच, या वाहिन्या पाहतील....?
- चंबू गबाळे ( २७ जुलै २००९)

Tuesday, June 23, 2009

माझ्या महाराष्ट्राचा त्रिकालवेध

समस्त तारकां दळांत भारी हर्ष दाटला होता. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहिकडे असं म्हणत तारकांगणात मुले हर्षभरे नाचत होती. मुलांच्या उधाणाला पारावार नव्हता. अहो का म्हणून का विचारताय ? त्यांच्या च्यानेलचा वाढदिवस म्हटलं की होणारच नां मुलांना आनंद...! माझा च्यानेल मोठ्ठा झाला म्हणून सारे कुमार एकत्र आले. आणि कुठल्या बागेत नाही बरं का.. तर कुठल्याशा चांगल्या पॉश पंचतारांकित हॉटेलमध्ये... अर्थात, वाढदिवसाला स्टार मंडळी येणार म्हटलं की तशीच बडदास्तही ठेवली पाहिजे म्हणा... तर वाढदिवसाची पार्टी सुरू झाली. अहो पार्टी काय म्हणता ? हॉटेलमध्ये असलं म्हणजे काय फक्त पार्टीच असते का ? अहो, तिथे तर माझा महाराष्ट्र ट्वेंटी ट्वेंटी अशा गहन आणि गंभीर विषयावर चर्चा सुरू होती. राजकारणापासून सगळ्याच क्षेत्रातल्या असामी त्याला उपस्थित होत्या आणि त्यांचे विचार सारी मुलं अवाक होऊन टेबलावर समोर जे येईल ते स्वाहा करत ऐकत होती. अकरा वर्षांनी माझ्या महाराष्ट्राचे काय होणार या चिंतेने ग्रासलेले सगळेच जण आपापले थोर विचार मांडत होते. उभा आडवा महाराष्ट्र मांडायचा म्हणजे त्याची अणुसंरचना मुळापासून तपासली पाहिजे नां..! त्यातून काकोडकर प्रभृतींनी मर्मावरच बोट ठेवलं. न्यूनगंड सोडला तरच महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करू शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा... असं महाराष्ट्र गीतात जरी म्हटलं असलं तरी आता मात्र, ते अजिबात खरं नाही, हे आताच्या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झालेलंच आहे. नजरेसमोर राष्ट्र ठेवून वाटचाल सुरू केलेल्या राष्ट्रवादी लोकांच्या तव्यावरची भाकरी करपली, हे त्यांच्या लक्षात यायला बराच वेळ गेला. बिच्चाऱ्या घड्याळाचाच दोष... आबांनाही त्यामुळे राहावलं नसावं. त्यांनी आपला गड शाबूत आहे ते सांगण्याचा निकराचा प्रयत्न केला. मुंबई हल्ल्यात आपला बळी गेल्याचं शल्य कदाचित पचवू न शकलेल्या विलासरावांनी ही नामी संधी सोडली नाही. कायदा आणि सुव्यवस्था योग्य असेल तर सगळे आलबेल असते, असं सांगत या कायदा आणि सुव्यवस्थेनंच आपला आणि आबांचा राजकीय बळी गेला, असं ते म्हणाले आणि उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली. शरपंजरी पडलेल्या सेनेच्या पंतांनीही महाराष्ट्राचे मनोहारी स्वप्न मांडण्याचा प्रयत्न केला. तारकादळांच्या मांदियाळीत कमळदळांनीही आपल्या पाकळ्या पसरण्याची संधी दवडली नाही. अकरा वर्षांनी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असेल आणि राजकीय पक्षांची संख्या रोडावेल, अशी भविष्यवाणी मुंड्यांनी केली. ते करताना त्यांनी आबांनाच लक्ष्य केलं. राष्ट्रवादी तेव्हा काँग्रेसमध्ये विलीन झालेला असेल आणि आबा तुम्ही काँग्रेसमध्ये असाल, असं गोपीनाथराव म्हणाले. तेव्हा आबांना मनातल्या मनात बकरा झाल्याचं नक्कीच वाटलं असणार... असो. या सगळ्या राजकीय भाषणांमध्ये कुमारांना अपेक्षित असलेला स्वप्नातला महाराष्ट्र कुठेच येत नव्हता. त्यातून दिसून आली ती फक्त राजकीय शेरेबाजी आणि सत्ता संघर्षातले अंतर्गत हेवेदावे... अकरा वर्षांनी महाराष्ट्र कसा असेल याची चर्चा सुरू असतानाच आजचा महाराष्ट्र कसा आहे, त्याचे नेतृत्व करणारे कसे आहेत, याचेच वास्तव पाहायला मिळाले. महाराष्ट्राचं नवनिर्माण करू पाहणाऱ्या राजकुमारांनीही या सगळ्या परिस्थितीला राजकारण्यांनाच जबाबदार धरले. पण, हे करत असताना एक बोट तिकडे असलं तरी उरलेली बोटं आपल्याकडे येतात, हे सोयिस्करपणे ते विसरले असावेत. राजकीय प्रभृतींची असली भाषण कुस्ती पाहून उपस्थितांपैकी अनेक जण धोबीपछाड झाले म्हणे.... हे सगळं पाहून त्रिकालवेधी कुमारांना राहावलं नाही. त्यांनी आपली अस्मिता जपत ठाम मतं मांडली. महाराष्ट्राचं सामर्थ्य सांगताना आपल्याला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव आठवते. याचे कारण त्रिकालवेधींनी बहुत खुबीने विशद केले. स्वातंत्र्यपूर्व काळात खरेतर असे आयकॉन झाले, पण त्यांना कोणत्या ना कोणत्या जातीच्या चौकटीत बंदीस्त करून ठेवले गेले. त्या चौकटीबाहेर कधी हे आयकॉन येऊ दिलेच नाहीत. विचारसरणींच्या नावाखाली जातीच्याच अस्मिता बलाढ्य झाल्याने महाराष्ट्राची प्रगती खुंटली, हे वास्तव बरंच काही सांगून जातं. पण, लक्षात कोण घेतो ? या वास्तवाकडे कुमारांनी कितीही उघडा डोळे बघा नीट असं सांगितलं तरी ऐकतील ते राजकारणी कसले....!
- चंबू गबाळे ( 23 जून 2009)

Wednesday, May 27, 2009

पळा, पळा... पहिले कोण ?

आटपाट नगरात आज आनंदीआनंद सुरू होता. हत्तीवरून, सायकलवरून मिळेल त्यावरून साखर वाटून आनंद साजरा केला जात होता. उत्फुल्ल फुलांचा गालिचा नगराच्या रस्त्यांवरून अंथरला होता. उगवतीचा सूर्य समस्त प्रजाजनांसाठी सोनियाचा दिनु घेऊन आला होता. मनमोहून टाकणारा हा क्षण आटपाटनगरवासियांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आला होता. उत्तरेतल्या सिंहाला पुन्हा सिंहासनावर बसवण्यासाठी दाक्षिणात्य वाघांनीही पुढाकार घेतला आणि नवा गडी नवं राज्य येणार ही भाकितं डावलून जुन्याच तख्ताला नवा मुलामा मिळाला. आटपाटनगरातल्या आम आदमीनं जुनाच हात धरला आणि ‘उजव्या- डाव्यां’च्या ‘करात’ काहीच उरले नाही. अनेकांच्या मनातली आशेची कमळदळं उमलण्याआधीच सुकून गेली. लक्ष्य साधण्यासाठी सरसावलेले धनुष्यातले बाणही सुटण्याआधीच निखळून पडले. काहींनी तर मुहूर्ताचा गजरही लावून ठेवला होता, पण नेमक्या वेळेला घड्याळच बंद पडले त्याला काय करायचं ? नजरेसमोर राष्ट्र असलं तरी ह्रदयातल्या महाराष्ट्रानं दगा दिला. नाकर्ते हटवा असं साकडं घालणाऱ्यांवरच भगव्याची विरक्ती पत्करण्याची वेळ आली. नव्या राज्याभिषेकाचे अंदाज वर्तवणाऱ्या च्यानेलांवरच्या कुडमुड्या ज्योतिषांचेही अंदाज असे फोल ठरले... पण गिरे तो भी टांग उपर अशी प्रवृत्ती नसानसांत ( नव्हे बूमाबूमात ) भिनलेल्या आटपाटनगरातल्या समस्त च्यानेलभाऊंनी तरीही आम्हीच कसे बरोबर होतो, आमचंच विश्लेषण कसं बरोबर होतं, त्याचा धोशा सुरू केला. ज्यांना साधं मन जिंकता आलं नाही, अशा जग जिंकू पाहणाऱ्यांनी तर सलग शंभर तास अखंड हरिनामासारखं निवडणुकीचं पारायण सुरू ठेवलं. काहींनी सिंदबादच्या सात सफरींसारखे सरकारचे सात पर्याय सांगत उगाचच डोळे उघडे ठेवून नीट बघा, नीट बघा, अशा आरोळ्या द्यायला सुरूवात केली. आटपाटनगरातल्या पामर जनतेला तेच खरे वाटले आणि काय गंमत पाहा, त्या कुमारवयीन च्यानेलचे स्टार चमकले... टॅमनामक सर्वेक्षण संस्थेनं अखिल (निखिल नव्हे) मऱ्हाटी प्रांतात तेच च्यानेल नंबर वन असल्याची प्रशस्ती दिली. एकीकडे आटपाटनगराच्या लोकशाहीतला नवा अंक सुरू होता, तर दुसरीकडे मऱ्हाटी च्यानेलांचंही टॉप पोझिशन मिळवण्यासाठीचं नाटक असं भरात आलं होतं. आटपाटनगरीतल्या निवडणुकीचा हा मेगाइव्हेन्ट प्रत्येक च्यानेलनं आपापल्या परिनं साजरा केला. आता टॅमभाऊंच्या रिपोर्टानं तर कहरच केलाय. प्रत्येक जणच ‘मीच नंबर वन, मीच नंबर वन...’ असं सांगत सुटलाय. आंधळ्याला दिसणाऱ्या हत्तीसारखी च्यानेलांची गत झालीय. एकाच वेळी दोन दोन आयपीएल ( योगायोग बघा, दोन्हीकडेही मोदी हा कॉमन फॅक्टर.... ) होत्या. असा मणिकांचन योग कोण सोडेल ? त्यामुळे च्यानेलांनीही बहुत होशियारी दाखवली आणि निवडणूकविषयक कार्यक्रमांचीही नावं तशीच ठेवली ( सुजाण वाचकांना अधिक सांगणे न लगे ) ट्वेंटी ट्वेंटीचा हा हँगओव्हर अजूनही कायम आहे. आता मंत्रिमंडळ जाहीर झालं त्या दिवशीच पाहा ना... प्रत्येकाचीच हेडलाईन... ‘टीम मनमोहन जाहीर...!’ ‘मनमोहन सरकारची दुसरी इनिंग’ आता बोला...! खेळातलं राजकारण आणि राजकारणातला खेळ असं अनोखं ‘कनव्हर्जन्स’ च्यानेलांवरतीच पाहायला मिळतं... च्यानेलांच्या हेडलाईन्स हा खरंतर स्वतंत्र विषय होऊ शकतो, त्याविषयी पुन्हा केव्हा तरी.... तूर्त घेऊया एक ब्रेक... तुम्ही पाहात राहा तुम्हाला वाट्टेल ते...!
- चंबू गबाळे

Tuesday, May 5, 2009

चौथ्या स्तंभाच्या पायथ्याशी....

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचं सांगितलं जातं. या चौथ्या स्तंभाची आजची अवस्था काय आहे, कोणत्या वास्तवाने हा स्तंभ पोखरला जातोय, याची तटस्थपणे चिकित्सा करण्याची गरज निर्माण झालीय. त्यामुळेच आम्ही तमाम पत्रकार मित्रांशी चर्चा केली आणि त्यातूनच चौथा स्तंभाविषयी उपहासगर्भ लिहिण्यासाठी आम्ही उद्युक्त झालो. त्यातून कुणा एकाला टार्गेट करणं (जसं सध्याचे न्यूज चॅनेल्स करतात) हा आमचा हेतू अजिबात नाही. पत्रकारितेचं सध्याचं बेंगरूळ रुप नेटीझन्स समोर आणणं आणि त्यावर चर्चा घडवून आणणं हाच एकमेव उद्देश या पाठीमागं आहे. चॅनेल्सच्या आणि त्यातही मराठी वाहिन्यांच्या बाबतीच बोलायचं झालं तर कुणाला जग जिंकायची स्वप्नं पडतायत, तर कुणाला आपलीच दृष्टी चांगली असल्याचे भास होऊन दुसऱ्यांना उघडा डोळे बघा नीट असा फुकटचा सल्ला द्यावासा वाटतोय. काही जण सामर्थ्य महाराष्ट्राचे असल्याचा धोशा लावतायत, तर काही मी मराठी मी मराठीचा उद्घोष करत टीआरपी खेचतायत. तर काही जण काहीच खास नसतानाही उगाचच बातम्या खास चोवीस तास असा नारा देतायत. एकूणच मराठी वाहिन्यांचं आणि या वाहिन्यांवरून दाखवल्या, बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेचं भीषण वास्तव चव्हाट्यावर आणणं आवश्यक आहे. तसे तर या बाबत अधिकार वाणीनं लिहिणारे काही ब्लॉग्ज सुरू आहेत. त्यात आणखी एका ब्लॉगची भर कशाला ? असा प्रश्नही तुम्हाला पडू शकेल. त्यात वावगं काहीच नाही. पण, तरिही मांडण्याची शैली आणि अनुभव, निरीक्षण याच वेगळेपण नक्कीच असू शकतं. याच भूमिकेतून पत्रकारितेतलं गबाळेपण मांडण्यासाठी मी चंबू गबाळे आजपासून तुम्हाला ‘नेट’ भेटणार आहे. तर मित्रांनो, वाचा आणि वाचत राहा....!
- चंबू गबाळे....