आटपाट नगरात आज आनंदीआनंद सुरू होता. हत्तीवरून, सायकलवरून मिळेल त्यावरून साखर वाटून आनंद साजरा केला जात होता. उत्फुल्ल फुलांचा गालिचा नगराच्या रस्त्यांवरून अंथरला होता. उगवतीचा सूर्य समस्त प्रजाजनांसाठी सोनियाचा दिनु घेऊन आला होता. मनमोहून टाकणारा हा क्षण आटपाटनगरवासियांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आला होता. उत्तरेतल्या सिंहाला पुन्हा सिंहासनावर बसवण्यासाठी दाक्षिणात्य वाघांनीही पुढाकार घेतला आणि नवा गडी नवं राज्य येणार ही भाकितं डावलून जुन्याच तख्ताला नवा मुलामा मिळाला. आटपाटनगरातल्या आम आदमीनं जुनाच हात धरला आणि ‘उजव्या- डाव्यां’च्या ‘करात’ काहीच उरले नाही. अनेकांच्या मनातली आशेची कमळदळं उमलण्याआधीच सुकून गेली. लक्ष्य साधण्यासाठी सरसावलेले धनुष्यातले बाणही सुटण्याआधीच निखळून पडले. काहींनी तर मुहूर्ताचा गजरही लावून ठेवला होता, पण नेमक्या वेळेला घड्याळच बंद पडले त्याला काय करायचं ? नजरेसमोर राष्ट्र असलं तरी ह्रदयातल्या महाराष्ट्रानं दगा दिला. नाकर्ते हटवा असं साकडं घालणाऱ्यांवरच भगव्याची विरक्ती पत्करण्याची वेळ आली. नव्या राज्याभिषेकाचे अंदाज वर्तवणाऱ्या च्यानेलांवरच्या कुडमुड्या ज्योतिषांचेही अंदाज असे फोल ठरले... पण गिरे तो भी टांग उपर अशी प्रवृत्ती नसानसांत ( नव्हे बूमाबूमात ) भिनलेल्या आटपाटनगरातल्या समस्त च्यानेलभाऊंनी तरीही आम्हीच कसे बरोबर होतो, आमचंच विश्लेषण कसं बरोबर होतं, त्याचा धोशा सुरू केला. ज्यांना साधं मन जिंकता आलं नाही, अशा जग जिंकू पाहणाऱ्यांनी तर सलग शंभर तास अखंड हरिनामासारखं निवडणुकीचं पारायण सुरू ठेवलं. काहींनी सिंदबादच्या सात सफरींसारखे सरकारचे सात पर्याय सांगत उगाचच डोळे उघडे ठेवून नीट बघा, नीट बघा, अशा आरोळ्या द्यायला सुरूवात केली. आटपाटनगरातल्या पामर जनतेला तेच खरे वाटले आणि काय गंमत पाहा, त्या कुमारवयीन च्यानेलचे स्टार चमकले... टॅमनामक सर्वेक्षण संस्थेनं अखिल (निखिल नव्हे) मऱ्हाटी प्रांतात तेच च्यानेल नंबर वन असल्याची प्रशस्ती दिली. एकीकडे आटपाटनगराच्या लोकशाहीतला नवा अंक सुरू होता, तर दुसरीकडे मऱ्हाटी च्यानेलांचंही टॉप पोझिशन मिळवण्यासाठीचं नाटक असं भरात आलं होतं. आटपाटनगरीतल्या निवडणुकीचा हा मेगाइव्हेन्ट प्रत्येक च्यानेलनं आपापल्या परिनं साजरा केला. आता टॅमभाऊंच्या रिपोर्टानं तर कहरच केलाय. प्रत्येक जणच ‘मीच नंबर वन, मीच नंबर वन...’ असं सांगत सुटलाय. आंधळ्याला दिसणाऱ्या हत्तीसारखी च्यानेलांची गत झालीय. एकाच वेळी दोन दोन आयपीएल ( योगायोग बघा, दोन्हीकडेही मोदी हा कॉमन फॅक्टर.... ) होत्या. असा मणिकांचन योग कोण सोडेल ? त्यामुळे च्यानेलांनीही बहुत होशियारी दाखवली आणि निवडणूकविषयक कार्यक्रमांचीही नावं तशीच ठेवली ( सुजाण वाचकांना अधिक सांगणे न लगे ) ट्वेंटी ट्वेंटीचा हा हँगओव्हर अजूनही कायम आहे. आता मंत्रिमंडळ जाहीर झालं त्या दिवशीच पाहा ना... प्रत्येकाचीच हेडलाईन... ‘टीम मनमोहन जाहीर...!’ ‘मनमोहन सरकारची दुसरी इनिंग’ आता बोला...! खेळातलं राजकारण आणि राजकारणातला खेळ असं अनोखं ‘कनव्हर्जन्स’ च्यानेलांवरतीच पाहायला मिळतं... च्यानेलांच्या हेडलाईन्स हा खरंतर स्वतंत्र विषय होऊ शकतो, त्याविषयी पुन्हा केव्हा तरी.... तूर्त घेऊया एक ब्रेक... तुम्ही पाहात राहा तुम्हाला वाट्टेल ते...!
- चंबू गबाळे
Wednesday, May 27, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
masta...khup khup aavadalaa lekh.
ReplyDeleteyala mhanatat shaljoditale maarane...apratim..