आटपाट नगरातली ही एक गोष्ट. तिथे असतं एक वर्तमानपत्र. ज्या काळात ते सुरु झालं तेव्हा ना ना म्हणता म्हणता पत्रकारितेच्या विश्वात नवी सकाळ उगवली. लोकांचं मत काहीही असलं आणि लोकांनी कुणाच्या हाती सत्ता दिलेली असली तरी बहुतेक पुढारी ते वर्तमानपत्र वाचल्याशिवाय सकाळची कुठलीही आन्हिकं करत नव्हते, अशी त्या वर्तमानपत्राची ख्याती होती. समृद्ध परंपरा असलेलं हे वर्तमानपत्र सध्या मात्र उत्तम व्यवस्थापन नसल्यानं गुळमुळीत झालंय, अशी चर्चा आहे. त्याला कारणंही तशीच आहेत म्हणे.... आता हे सगळं सांगण्याचं औचित्य काय, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. त्याचं असं झालं ब्लॉगच्या दुनियेत सध्या एका भाजीवाल्याची कथा चांगलीच गाजतेय. एक म्हणे भाजीवाला असतो, त्याला त्याच्या धंद्यात यश मिळतं आणि नंतर त्या धंद्याचा विस्तार करण्याच्या नादात धंद्यातला मूळ हेतूच कसा हरवत जातो आणि धंद्याची सूत्रं व्हीजन नसलेल्या माणसाकडे गेल्यामुळे भाजीवाल्याचा वडा कसा होतो, असं एकूण कथासूत्र त्यातनं रेखाटण्यात आलंय. या कथेच्या लेखकानं भलेही त्या कथेसंदर्भात, ही कथा सर्वस्वी काल्पनिक असून त्याचा वास्तवातल्या कुठल्याही संस्थेशी संबंध नसल्याचं सुरुवातीलाच डिस्क्लेमर दिलं असलं तरी त्यातले संदर्भ, त्यातले उल्लेख आणि त्याहीपेक्षा त्याच्यावर उमटलेल्या अनामिकांच्या प्रतिक्रिया वाचल्या की, त्यातलं ढळढळीत वास्तव समोर येतं आणि माध्यमाच्या भलत्याच हँगओव्हरमध्ये आपली सकाळ झाल्याशिवाय राहात नाही. (वाचा - http://ashishchandorkar.blogspot.com/ ) श्रीमान लेखकाने ज्या पद्धतीने ही रुपककथा रेखाटलीय, त्यावरनं सामान्य वाचकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यातला सगळ्यात पहिला आणि स्वाभाविक प्रश्न हा की, लेखकाला त्या भाजीवाल्याचा एवढा राग का बरं असावा ? फार विचारपूर्वक वाचल्यानंतर त्यातलं सत्य समोर येतं. त्याचं असं आहे म्हणे.. हे श्रीमान लेखक याच भाजीवाल्याच्या कंपनीत कामाला होते. तिथे त्यांनी चांगली चार साडे चार वर्षं भाजी विकली म्हणे. अनेकांचा तर असा आक्षेप आहे म्हणे की, त्यांना या भाजीवाल्याच्या कंपनीत काही लोकांनी अभय देऊन भरभरुन दान दिलं. पण, दिवस बदलतात. तसे या श्रीमान लेखकाचेही दिवस बदलले. कॉर्पोरेट जगात भाजीवाला उतरला आणि त्यानं भाजी विकण्याच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवायला सुरुवात केली. त्यातल्या काही कल्पना राबवण्यात अपयशी ठरल्यानं या श्रीमान लेखकाला अभय देणारे साहेबच कंपनीतनं बाहेर पडले. असा एकूणच आनंद लक्षात घेता, भाजीवाल्यानं नव्या शिलेदाराच्या हाती भाजीविक्रीची सूत्रं सोपवली. अपेक्षा अशी की, भाजीविक्री उत्तमप्रकारे चालेल आणि टीव्हीवरच्या त्याच्या जाहिरातींनाही संजीवनी मिळेल. आता, श्रीमान लेखक त्यामुळेच अडचणीत आले. त्यांचा फटकळ स्वभाव आडवा आला. ऐन मोक्याच्या वेळी आपलीच भाजी कशी चांगली आणि नंबरी आहे, हे सांगायच्या ऐवजी या श्रीमान लेखकानं ती कशी खराब आणि चुकीच्या खतांवर वाढवलीय, असं खुलेआम सांगायला सुरुवात केली. तिथेच त्यानं पेंड खाल्ली. कुवतीपेक्षा भाजीविक्रीचे जादा अधिकार मिळाल्यानं शेफारलेल्या या महोदयांना ते चांगलंच महागात पडलं. टीव्हीवर झळकणाऱ्या या महोदयांना कमी वेतनावर वर्तमानपत्रातनं जाहिरात करण्यास सांगण्यात आलं. नाईलाज झालेल्या या श्रीमान लेखकानं अखेर पोटासाठी तडजोड केलीच. गप्प बसून भाजी विकली असती तर स्वतःचं पोट आरामात भरता आलं असतं नां... पण, सांगणार कोण ? खाईन तर तुपाशी असा पुणेरी बाणा असलेल्या श्रीमान लेखकाला अखेर भाजीवाल्याबरोबर काडीमोड घ्यावा लागला. नेमकं हेच शल्य भाजीवाल्याचा झाला वडामधून पदोपदी दिसून येतं. लेखनाची शैली चांगली असली तरी त्यामागचा हेतू शुद्ध नसल्यानं श्रीमान लेखकाबद्दल सहानुभूती वाटण्याऐवजी कीव वाटू लागते.
(तात्पर्य - मालकाशी कितीही मतभेद असले तरी त्याला विरोध करु नये. आपण नोकरी करतो, हे ढळढळीत सत्य आपल्याला नाकारता येत नाही. अन्यथा लायकी, पैसा आणि मस्ती असल्यास आपणच मालक व्हावे.)
- चंबू गबाळे
Sunday, April 11, 2010
Subscribe to:
Posts (Atom)