Wednesday, May 27, 2009

पळा, पळा... पहिले कोण ?

आटपाट नगरात आज आनंदीआनंद सुरू होता. हत्तीवरून, सायकलवरून मिळेल त्यावरून साखर वाटून आनंद साजरा केला जात होता. उत्फुल्ल फुलांचा गालिचा नगराच्या रस्त्यांवरून अंथरला होता. उगवतीचा सूर्य समस्त प्रजाजनांसाठी सोनियाचा दिनु घेऊन आला होता. मनमोहून टाकणारा हा क्षण आटपाटनगरवासियांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आला होता. उत्तरेतल्या सिंहाला पुन्हा सिंहासनावर बसवण्यासाठी दाक्षिणात्य वाघांनीही पुढाकार घेतला आणि नवा गडी नवं राज्य येणार ही भाकितं डावलून जुन्याच तख्ताला नवा मुलामा मिळाला. आटपाटनगरातल्या आम आदमीनं जुनाच हात धरला आणि ‘उजव्या- डाव्यां’च्या ‘करात’ काहीच उरले नाही. अनेकांच्या मनातली आशेची कमळदळं उमलण्याआधीच सुकून गेली. लक्ष्य साधण्यासाठी सरसावलेले धनुष्यातले बाणही सुटण्याआधीच निखळून पडले. काहींनी तर मुहूर्ताचा गजरही लावून ठेवला होता, पण नेमक्या वेळेला घड्याळच बंद पडले त्याला काय करायचं ? नजरेसमोर राष्ट्र असलं तरी ह्रदयातल्या महाराष्ट्रानं दगा दिला. नाकर्ते हटवा असं साकडं घालणाऱ्यांवरच भगव्याची विरक्ती पत्करण्याची वेळ आली. नव्या राज्याभिषेकाचे अंदाज वर्तवणाऱ्या च्यानेलांवरच्या कुडमुड्या ज्योतिषांचेही अंदाज असे फोल ठरले... पण गिरे तो भी टांग उपर अशी प्रवृत्ती नसानसांत ( नव्हे बूमाबूमात ) भिनलेल्या आटपाटनगरातल्या समस्त च्यानेलभाऊंनी तरीही आम्हीच कसे बरोबर होतो, आमचंच विश्लेषण कसं बरोबर होतं, त्याचा धोशा सुरू केला. ज्यांना साधं मन जिंकता आलं नाही, अशा जग जिंकू पाहणाऱ्यांनी तर सलग शंभर तास अखंड हरिनामासारखं निवडणुकीचं पारायण सुरू ठेवलं. काहींनी सिंदबादच्या सात सफरींसारखे सरकारचे सात पर्याय सांगत उगाचच डोळे उघडे ठेवून नीट बघा, नीट बघा, अशा आरोळ्या द्यायला सुरूवात केली. आटपाटनगरातल्या पामर जनतेला तेच खरे वाटले आणि काय गंमत पाहा, त्या कुमारवयीन च्यानेलचे स्टार चमकले... टॅमनामक सर्वेक्षण संस्थेनं अखिल (निखिल नव्हे) मऱ्हाटी प्रांतात तेच च्यानेल नंबर वन असल्याची प्रशस्ती दिली. एकीकडे आटपाटनगराच्या लोकशाहीतला नवा अंक सुरू होता, तर दुसरीकडे मऱ्हाटी च्यानेलांचंही टॉप पोझिशन मिळवण्यासाठीचं नाटक असं भरात आलं होतं. आटपाटनगरीतल्या निवडणुकीचा हा मेगाइव्हेन्ट प्रत्येक च्यानेलनं आपापल्या परिनं साजरा केला. आता टॅमभाऊंच्या रिपोर्टानं तर कहरच केलाय. प्रत्येक जणच ‘मीच नंबर वन, मीच नंबर वन...’ असं सांगत सुटलाय. आंधळ्याला दिसणाऱ्या हत्तीसारखी च्यानेलांची गत झालीय. एकाच वेळी दोन दोन आयपीएल ( योगायोग बघा, दोन्हीकडेही मोदी हा कॉमन फॅक्टर.... ) होत्या. असा मणिकांचन योग कोण सोडेल ? त्यामुळे च्यानेलांनीही बहुत होशियारी दाखवली आणि निवडणूकविषयक कार्यक्रमांचीही नावं तशीच ठेवली ( सुजाण वाचकांना अधिक सांगणे न लगे ) ट्वेंटी ट्वेंटीचा हा हँगओव्हर अजूनही कायम आहे. आता मंत्रिमंडळ जाहीर झालं त्या दिवशीच पाहा ना... प्रत्येकाचीच हेडलाईन... ‘टीम मनमोहन जाहीर...!’ ‘मनमोहन सरकारची दुसरी इनिंग’ आता बोला...! खेळातलं राजकारण आणि राजकारणातला खेळ असं अनोखं ‘कनव्हर्जन्स’ च्यानेलांवरतीच पाहायला मिळतं... च्यानेलांच्या हेडलाईन्स हा खरंतर स्वतंत्र विषय होऊ शकतो, त्याविषयी पुन्हा केव्हा तरी.... तूर्त घेऊया एक ब्रेक... तुम्ही पाहात राहा तुम्हाला वाट्टेल ते...!
- चंबू गबाळे

Tuesday, May 5, 2009

चौथ्या स्तंभाच्या पायथ्याशी....

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचं सांगितलं जातं. या चौथ्या स्तंभाची आजची अवस्था काय आहे, कोणत्या वास्तवाने हा स्तंभ पोखरला जातोय, याची तटस्थपणे चिकित्सा करण्याची गरज निर्माण झालीय. त्यामुळेच आम्ही तमाम पत्रकार मित्रांशी चर्चा केली आणि त्यातूनच चौथा स्तंभाविषयी उपहासगर्भ लिहिण्यासाठी आम्ही उद्युक्त झालो. त्यातून कुणा एकाला टार्गेट करणं (जसं सध्याचे न्यूज चॅनेल्स करतात) हा आमचा हेतू अजिबात नाही. पत्रकारितेचं सध्याचं बेंगरूळ रुप नेटीझन्स समोर आणणं आणि त्यावर चर्चा घडवून आणणं हाच एकमेव उद्देश या पाठीमागं आहे. चॅनेल्सच्या आणि त्यातही मराठी वाहिन्यांच्या बाबतीच बोलायचं झालं तर कुणाला जग जिंकायची स्वप्नं पडतायत, तर कुणाला आपलीच दृष्टी चांगली असल्याचे भास होऊन दुसऱ्यांना उघडा डोळे बघा नीट असा फुकटचा सल्ला द्यावासा वाटतोय. काही जण सामर्थ्य महाराष्ट्राचे असल्याचा धोशा लावतायत, तर काही मी मराठी मी मराठीचा उद्घोष करत टीआरपी खेचतायत. तर काही जण काहीच खास नसतानाही उगाचच बातम्या खास चोवीस तास असा नारा देतायत. एकूणच मराठी वाहिन्यांचं आणि या वाहिन्यांवरून दाखवल्या, बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेचं भीषण वास्तव चव्हाट्यावर आणणं आवश्यक आहे. तसे तर या बाबत अधिकार वाणीनं लिहिणारे काही ब्लॉग्ज सुरू आहेत. त्यात आणखी एका ब्लॉगची भर कशाला ? असा प्रश्नही तुम्हाला पडू शकेल. त्यात वावगं काहीच नाही. पण, तरिही मांडण्याची शैली आणि अनुभव, निरीक्षण याच वेगळेपण नक्कीच असू शकतं. याच भूमिकेतून पत्रकारितेतलं गबाळेपण मांडण्यासाठी मी चंबू गबाळे आजपासून तुम्हाला ‘नेट’ भेटणार आहे. तर मित्रांनो, वाचा आणि वाचत राहा....!
- चंबू गबाळे....